text
stringlengths
0
147
होता. तो 'सुन्नी' पंथीय मुसलमान होता. दख्खनी, 'शिया' पंथीय मुसलमानांच्या बदल्यात
त्याच्या मनात प्रचंड वैरभाव होताच. महाराजांनी नेमका याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचे
ठरवले. या दोन्ही शाह्यांना सोबत घेऊन मोगलांचे बस्तान हिंदुस्थानातून कायमचे उठवण्याचा
डाव महाराजांनी मांडला.
कुतुबशहाच्या दरबारात महाराजांचे प्रल्हाद निराजी नाशिककर या नावाचे एक वकील
होते. त्यांनी महाराजांचे सारे म्हणणे कुतुबशहाला सांगितले. या कुतुबशहाचे नाव होते अबुल
हसन कुत्बशाह ऊर्फ 'तानाशाह'. या कुतुबशहाचा सारा कारभार त्याचे वजीर मादण्णापंत
पिंगळी हे अत्यंत हुशार ब्राह्मण पाहात होते. एखाद्या सुलतानीत बादशाही वजिरी हिंदू अन्
त्यातूनही ब्राह्मणाला देण्याची घटना अपवादात्मक होती. मोंगल बादशहा अकबराचा वजीर
पंडित 'महेश दास' ऊर्फ 'बिरबल' याच्यानंतर मादण्णापंतांचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण
होते. बादशहाने मादण्णापंतांना 'सूर्यप्रकाशराव' असा किताब दिला होता. मादण्णापंतांनी
महाराजांचे हे राजकारण कुतुबशहाला समजावून सांगितले आणि कुतुबशहाने मोठ्या
<<<
आनंदाने महाराजांना भेटण्याची तयारी दर्शवली.
दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी विजयादशमी होती. याच दिवशी महाराजांनी 'दक्षिण
दिग्विजयार्थ' सीमोल्लंघन केलं. या दक्षिणी पंथांच्या एकजुटीत एक अडसर मात्र अजूनही
कायम होता. विजापूरच्या आदिलशाहीत दख्खनी मुसलमानांच्या तुलनेत हिंदुस्थानी
पठाणांचंच प्राबल्य अधिक होतं. यावेळी विजापूरचा वजीरही एक पठाणच होता. त्याचं नाव
होतं 'बहलोलखान'. त्यामुळे प्रथम दख्खनेतून या पठाणांना हाकलून देऊन मग
औरंगजेबाकडे पहाणे गरजेचे होते. महाराज भागानगर-गोवळकोंड्याकडे जात असतानाच
कर्नाटकच्या कोप्पळ प्रांतात विजापूरच्या हुसेनखान मियाना या पठाणाशी मराठ्यांची गाठ
पडली. या युद्धात सर्जेराव जेध्यांचा तरुण पुत्र नागोजी मारला गेला, परंतु पठाणांचा मात्र
जबरदस्त पराभव झाला. खुद्द हुसेनखान मियाना कैद झाला !!
फेब्रुवारी १६७७ च्या पहिल्या आठवड्यातच महाराजांची स्वारी भागानगरात प्रवेशती
झाली. या पराक्रमी राजाचे तेलंगणच्या रयतेने आणि खुद्द कुतुबशहांनी जंगी स्वागत केले.
महाराजांसोबत या वेळी सुमारे पंचवीस हजार मराठी फौज होती. भागानगरच्या मुक्कामी
मराठेशाही आणि कुतुबशाही यांच्यात एक महत्त्वाचा तह झाला. तो तहनामा थोडक्यात
असा-
१) भागानगरच्या मुक्कामी मराठी सैन्याच्या खर्चासाठी कुतुबशहांनी साडेचार लक्ष रु.
रोख द्यावेत.
२) मराठ्यांच्या दक्षिणेकडील मोहिमेमध्ये कुतुबशाहीचे चार हजार पायदळ व एक हजार
घोडदळ मराठ्यांच्या सोबत असावे.
३) कुतुबशाही सैन्यावर कुतुबशाहीच सेनापती मिर्झा मुहम्मद अमिन सरलष्कर असेल.
त्याचा खर्च, दारूगोळा इ. बादशहांनी पुरवावा.
४) कुतुबशाहीने पूर्वी ठरल्याप्रमाणे दरसाल एक लक्ष रु. खंडणी मराठ्यांना देत जावी.
५) पूर्वीप्रमाणेच मराठी वकील (प्रल्हाद निराजी नाशिककर) कायम कुतुबशाही
दरबारात रहावा.
६) दख्खनच्या मोहिमेत जिंकला जाणारा जो भाग पूर्वी शहाजीराजांकडे नसेल असा
मुलुख कुतुबशाहीच्या ताब्यात असावा.
७) उभय पक्षांनी कायम एकरूप राहून पठाण आणि मोगलांचा बिमोड करावा.
महाराज आणि कुतुबशहा यांच्यात हा अत्यंत महत्त्वाचा करार झाला. यानंतर दि. १०
मार्च १६७७ रोजी महाराजांनी पुढील मोहिमेकरिता भागानगर (सध्याचे हैदराबाद) सोडले.
या वेळी त्यांच्याबरोबर तहात ठरल्याप्रमाणे कुतुबशाही सैन्यही होते.
कुतुबशाहीच्या मुक्कामातच महाराजांनी दक्षिणी पंथाच्या एकजुटीकरिता अनेक
संस्थानिक, मांडलिक, सरदार इत्यादींना पत्रे पाठवली. परंतु, दुर्दैवाने महाराजांना त्याचा
काहीही परिणाम दिसून आला नाही. यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या आणि
सम्राट कृष्णदेवरायाने बांधलेल्या पवित्र श्री शैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन थेट चंदीच्या
<<<
रोखाने निघाले. चंदीचा (जिंजी) हा प्रचंड किल्ला विजापूरकरांकडे होता. महाराजांनी थेट
किल्लेदार नसिर मुहम्मदला वश केले आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता हा प्रचंड किल्ला
स्वराज्यात दाखल झाला. चंदीच्या या विजयानंतर वेल्लोरला वेढा पडला. पण किल्ला दाद
देईना, तेव्हा फौज वेल्लोरला ठेवून (सुमारे दोन हजार घोडदळ व पाच हजार पायदळ)
महाराज तंजावरच्या रोखाने निघाले.
तंजावरच्या वाटेवर असतानाच तिरूवाडी प्रांतात विजापूरच्या शेरखान लोदी या
पठाणाचा महाराजांनी समाचार घेतला. दि. ६ जुलै १६७७ या दिवशी शेरखानाचा अत्यंत
दारुण पराभव झाला.
शेरखानाच्या या प्रचंड पराभवाची इतकी धास्त विजापुरी सैन्याने घेतली की, या
प्रांतातील वालदूर, तेवेनापट्टणम्, बाणागिरी इ. किल्लेही विनासायास मराठ्यांना मिळाले.
शेवटी शेरखानाने अत्यंत बिकट अवस्थेत महाराजांशी तह केला आणि अखेर १६७७ च्या
पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराज तंजावरमध्ये दाखल झाले. महाराजांनी एकोजीराजे
भोसले (माता तुकाबाई), संताजीराजे (माता नरसाबाई) या आपल्या सावत्र बंधूंची भेट
घेतली. यांच्यासोबतच महाराजांनी भिवजीराजे, प्रतापजीराजे, कोयाजीराजे
(शहाजीराजांच्या नाटकशाळांचे पुत्र) यांच्याही भेटी घेतल्या आणि महाराजांनी एकोजी
राजांपाशी विषय काढलाच !-
"आपण आम्हांस सामील व्हावे. ते जमत नसेलच तर शहाजी राजांच्या दौलतीपैकी
निम्मी दौलत वाटून ती आम्हांस द्यावी. आजपर्यंत आम्ही काही मागितले नाही. तुम्ही
आपल्या मनाप्रमाणे सारी वहिवाट केली. आता तुम्ही स्वतः मिळवलेल्या दौलतीतले आम्हास
काही नको, परंतु वडिलांच्या दौलतीतील निम्मा हिस्सा आम्हास द्यावा!"
परंतु एकोजीराजांच्या मनास ते काही केल्या पटेना. अन् एके दिवशी ते महाराजांना न
सांगताच छावणीतून अक्षरशः पळून गेले. का? तर महाराज त्यांना कैद करतील म्हणून !! हे
पाहून महाराजांना फार वाईट वाटले. ते उद्वेगाने उद्गारले ...
' ... धाकुटे ते धाकुटेच! बुद्धीही धाकुटेपणायोग्य केली. महाराजांचे एक सावत्र बंधू
संताजीराजे महाराजांना येऊन मिळाले. परंतु, एकोजीराजे ऐकेनात हे पाहून महाराजांनी
कोलेरन नदीच्या उत्तरेकडचा, एकोजीराजांचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. पुढे होसकोट,
कोलार, बाळापूर, कावेरीपट्टणम्, वृद्धाचलम् इ. प्रदेश जिंकून महाराज उत्तरेकडे येत
असतानाच, इकडे एकोजीराजांनी कर्नाटकातच असलेल्या संताजीरावांवर प्रचंड हल्ला
चढवून संताजीराजांना पराभूत केले. परंतु माघार घेतलेल्या संताजीराजांनी आणि
रघुनाथपंत हणमंत्यांनी ऐन मध्यरात्रीच एकोजीराजांवर हल्ला चढवला. दिवसभरच्या
थकव्याने विश्रांती घेत असलेल्या तंजावरी फौजेचा पाडाव झाला. यात एक हजार
आणि प्रचंड लूट संताजीराजांना मिळाली.
एकोजीराजांच्या पराभवामुळे महाराजांनाही दुःख हे झालेच. एकोजी राजांना आता फार
उदासीनता आली होती. महाराजांनी मोठ्या उदार मनाने चंदी नजीकचा सात लक्ष रु.
<<<
उत्पन्नाचा मुलुख एकोजीराजांना देऊन टाकला आणि एक अत्यंत रसाळ पत्र लिहून राजांनी
समजूत काढली. महाराज म्हणतात,
" ... आम्ही तुम्हांस वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? याउपरी सहसा
वैराग्य न धरिता मनातून विषण्णता (काढून) कालक्रमण करीत जाणे ... रिकामे बैसोन
लोकाहाती नाचीज खावून काल व्यर्थ न गमावणे. कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती. वैराग्य
उतारवयी कराल ते आज उद्योग करून आम्हासही तमासे दाखविणे ... "
यानंतर कर्नाटकातील विजापूरकरांचाच गदग प्रांत काबीज करून जून १६७८ मध्ये
महाराज परतले.
<<<
महाराज दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले आणि
एक महिन्यातच, दि. १ नोव्हेंबर १६७६ या दिवशी संभाजीराजे पत्नी शृंगारपुरात
येऊन राहिले. महाराजांनी युवराज संभाजीराजांना शृंगारपूर-प्रभावळी या प्रांताचे सुभेदार
म्हणून नेमले होते. वास्तविक संभाजीराजे हे युवराज होते. राजांच्या माघारी राजधानीत